Saturday, 23 January 2016

तुटल्या-फुटल्या काळजांनी एकदाच वाचावं... ‘प्रेम हे असंच असतं’

तुटल्या-फुटल्या काळजांनी एकदाच वाचावं... 

              ‘प्रेम हे असंच असतं’


जेव्हा ‘प्रेम हे असंच असतं’ हे सतीश टोणगे यांचं पुस्तक हातात पडलं तेव्हा पुस्तकात असणा-या प्रत्येक हिंदोळ्यावर वाचत-वाचत मन झुलत गेलं आणि पुस्तक कधी संपलं हे लक्षातही आलं नाही. 

‘प्रेम करणा-या प्रत्येकास हे पुस्तक प्रेमपूर्वक सादर’ या शब्दांनी पुस्तकाची सुरुवात होते. ‘तुझ्याशी एकरूप व्हावं वाटतं मला. तू तर माझ जग आहेस. त्याच जगात मला जगावंसं वाटतं’ अशा या पुस्तकातील ओळी मनात प्रेमाची एक तरल भावना निर्माण करतात. मातीची कूस उजवणा-या पाण्यासाठी पिंपळगावसह अनेक गावे धरणात गेली.त्याच धरणात गावाबरोबर गावातील माणसंही विस्कटली. अशा विस्कटलेल्या माणसांत गावातीलच भावकीने आजीला गाव सोडायला भाग पाडले. आजी कळंबला आली आणि तेथूनच आमच्या संघर्षपूर्ण जगण्याला सुरुवात झाली. संघर्षाच्या जगण्यातही लेखक सतीश टोणगे यांनी आपल्या काळजात प्रीतीचा झरा सतत वाहता ठेवला. गणेशाच्या साक्षीने प्रेमाच्या आठवणींना सुरुवात होते. तो सुखकर्ता म्हणत आपल्यालाही तुझ्या कृपेने प्रेमाचा आशीर्वाद मिळू दे म्हणणारा लेखक तिला प्रेम करण्याची सुबुद्धी देण्याची विनंती गणरायाला करतो. दिवाळीच्या सुटीत प्रत्येकाला आपल्या मामाच्या गावी जावंच वाटतं. तिथे असणा-या सगळ्याच नात्यात आपल्याला भावते ती मामाची पोरगीच. पण मामाला व मामीला आपलं नातं आवडत नाही. भाचा सोडून मामा दुस-याच एखाद्या मुलाच्या हातात पोरीचा हात देतो तेव्हा तिळतिळ तुटणारं काळीज तिच्या काळजीनं भरून येतं. आपण काय तिची काळजी घेतली नसती का? एका परक्याच्या हातात हात देऊन मामा मोकळा झाला. पण आपल्या आवडत्या माणसाच्या काळजीचा एक स्वर भाच्याच्या मनात सतत सलत राहिला. ‘आपल्या हातात काहीच नसतं रे. म्हणून मी तुला सांगते स्वप्न पूर्ण झालं नाही तर रडायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्व काही आपल्यासाठी नसतं.’ या मामाच्या पोरीनं दिलेल्या पत्रातल्या ओळीने जगण्यात नवा उत्साह निर्माण केला यात काहीच शंका नाही. 

प्रेमाच्या विविध प्रकारच्या कथा काही अनुभवाचे सामथ्र्य दाखवून अनेकांना सहजपणे सावरून जातात तर काहींच्या मनात तुटलेल्या प्रेमाचा एक तुकडा सहजपणे चिकटून राहतो. जिच्यावर आपण प्रेम करतो त्या माणसाचं हसणं, तिचं दिसणं काळजाच्या आत खोल एक अनामिक ओढ निर्माण करतं. प्रत्येक वेळी हुलकावणी देणारे प्रेम; परंतु त्यातूनही सावरणारे मन हा जगण्याला आशावादी करणारा विचार वाचकांना भावल्याशिवाय राहात नाही. माणसाने जगले पाहिजे, कॉलेजच्या कट्ट्यावरचे प्रेम किती खरे असते हे करणा-यालाच माहीत. जिच्याबरोबर जीवनसाथी बनण्याचे स्वप्न असते ती मात्र स्वप्नांची धुळधाण करून दुस-याच्या हातात हात घालून निघून जाते. ओघळणारे अश्रू आता थांबव आणि चल पुढच्या प्रवासाला. तिने मार्ग बदलला म्हणून तू रस्ता सोडण्याचा मूर्खपणा करू नकोस.जगण्याच्या प्रत्येक वळणावर फुलं फुलून येत नसतील, काटे तिच्या आसपास तर फुलांच्या हुंकाराने अलगद घ्यावे तिला कवेत आणि कराव्या जगण्याच्या-जागण्याच्या, एकमेकांत गुंतण्याच्या गोष्टी. ज्या गोष्टी सांगितल्या जातील पुन्हा आजी होऊन मांडीवर खेळणा-या नातवालाही एक वेगळ्या प्रकारच्या आशादायी भविष्याचा विचार लेखकाच्या मनातून पुस्तकात उतरल्याचे स्पष्टपणे जाणवते. 

आजही जपून ठेवल्यात पाकळ्या, तू दिलेल्या.. सुकून जरी गेल्या तरी हृदयात आहेत ओल्या..काळजातली ही ओल तुटलेल्या अनेकांसाठी आशावादी जगण्याची प्रचंड मोठी तागद मनात निर्मित करते. एकतर्फी प्रेमाने समाजात सात्विक प्रेमाला बदनाम केले आहे. हुंकारातून ओंकार आकारला जातो; पण निःशब्द भावनांना ओळखण्यासाठी स्वतःमध्ये प्रेमाची मोठी संकल्पना निर्माण होणे आवश्यक आहे. थोडा काळ घालवला की प्रेम आपल्या वळचणीला सहजपणे येते. त्यासाठी आपण जो काळ घालवणार आहोत तो केवळ आणि केवळ आपल्या पुस्तकाच्या विचारांमध्ये घालवला पाहिजे. आपलं ध्येय म्हणजे तिचे प्रेम मिळवणे असे न होता आपले ध्येय पहिल्यांदा स्वत:च्या पायावर उभा राहण्याचे आहे, जी स्वत:च्या पायावर उभा राहतात ती प्रेमात कधीही कोलमडत नाहीत. प्रेमदिवसाच्या पूर्वसंध्येला सॉरी म्हणून फोन करणारी मुलगी काळजाच्या आत खोल खोल उतरते तेव्हा आपल्याला आपल्या प्रेमाची उंची कळते. मामाच्या गावी असणा-या आंब्याच्या बागेत मामाच्या पोरीकडं दुर्लक्ष करून मेघना नावाच्या सुंदर मुलीवर जीव लावणा-या पोरांचे आठवणीतील प्रेम वाचले की मामाच्या मुलीची नाराजी आठवते. प्रेमाच्या गुजगोष्टी आंब्याच्या बागेत चालणा-या, दुस-याच उन्हाळ्याच्या सुटीत तिचे लग्न झाल्याचे कळाल्यावर मनाची होणारी अवस्था शब्दांत मांडताना शब्दांच्या पलीकडले प्रेम सहज लक्षात येते. 

मला समजून घे म्हणणारा अजूनही वाट पाहतोय. प्रेमाच्या त्रिकोणातून बाहेर पडताना मनावर उमटणारे घाव काहीही झाले तरी लपवता येत नाहीत, दुस-याच्या हातात हात घालून दूर नजरेच्या पलीकडे जाणारी ती नुसती एकच स्मित करते, काळजाच्या आत खोल-खोल ते स्मित रुतत जाते. कोण होती ती? प्रेम हे असंच असतं, पहिलं प्रेम, अनोळखी, स्वप्नातलं प्रेम, ती आणि मी, एकदाच भेट तू, तू माझीच यांसारख्या लेखांतून लेखकाच्या जगण्याच्या विविध पैलूंचा अभ्यास होतो. पण शेवटपर्यंत कळत नाही की, या सगळ्या भावना एकाच जगण्यात एकाला कशा कळत आहेत. प्रत्येक कहाणी वेगळी, तरीही त्या कहाणीत फसलेला लेखक वाचताना सतत दिसत होता, ब-याच ठिकाणी व्याकुळ होणारं प्रेम, व्यक्त आणि अव्यक्तच्या पलीकडे जाताना दिसते. त्यांच्या विविध प्रकारच्या लेखांतून मामाच्या मुलीला प्रेम या संकल्पनेतून एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. या सगळ्या गोष्टी जरी ख-या खु-या वाटत असल्या तरी कल्पनांच्या आधाराने ब-याच वेळा सावरलेल्या दिसत आहेत. ‘प्रेम हे प्रेम असतं...तुमचं आमचं सेम असतं..’ या ओळीप्रमाणे आपल्या जगण्यात प्रेमाचा बहर येवो..शेवटी माझ्या कवितेने प्रेम या सुंदर भावनेच्या मुळापर्यंत पोहोचू... 
गुज सारे अंतरीचे कोण मला सांगतो, 
मी माझाच़ श्वास मलाच रोज मागतो 

कोण होती ती वेडी वेड लावूनी हुलकावणी, 
पावसात दिसते रोज 
माहेरची ती पाहुणी 
पाहणीचे चार दिवस मोरपंखी सावल्या, 
थरथरणा-या वेली या पाण्याकडे धावल्या, 
सारेच दिवस नसतात प्रेम प्रेम म्हणायचे, 
विरहाच्या विराणीत राख होऊन जगायचे..... 

या पुस्तकाचे लेखक सतीश टोणगे (कळंब, जि. उस्मानाबाद) असून, पुस्तकासाठी दैनिक ‘एकमत’ चे संपादक पांडुरंग कोळगे यांची प्रस्तावना असून हे पुस्तक लातूर येथील इंडो एंटरप्रायजेसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची किंमत प्रेम करणा-यांसाठी १०० रु. ठेवण्यात आली आहे. हे पुस्तक तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनणार असून अनंतराव आडसूळ, शिवाजी कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुस्तक परीक्षण 
सुनील जवंजाळ, 
मु. पो. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर
==================================================================

No comments:

Post a Comment