मराठी लेख

1.खरंच मी तुझ्या प्रेमात पडलोय...

खरंच ग मी तुझ्या प्रेमात पडलोय 
अजूनही तुला कसे कळत नाही 
तू नसतानाही फक्त तुझ्या आठवणीत असतो 
तू असतेस तेव्हा माझे प्रेम तुला का कळत नाही..?’ 

तिने आपल्या भावना समजून घ्याव्यात असं प्रत्येक प्रेमवीराला वाटत असतं आणि आपल्या आवडणा-या व्यक्तीचे मन जिंकण्यासाठी प्रत्येकजण सतत धडपडही करत असतो. मात्र नजरेची भाषा समजून घ्यायला हृदयात स्पंदने निर्माण व्हावी लागतात. त्या वेळी प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते. ज्याला चेतना असतात त्यालाच वेदना होतात अन् ज्याला भावना असतात त्यालाच यातना होतात. अगदी या ओळीप्रमाणेच सौरभची अवस्था झाली होती. 

सौरभ आणि सिमरन एकाच कॉलेजला होते. त्यांच्यात खूप निखळ मैत्री होती. सिमरन दिसायला खूप सुंदर होती. अगदी साधे राहणीमान व मनमोकळ्या स्वभावाची. गोल चेहरा, लांब केस, बोलके डोळे आणि गालावर पडणा-या खळीने तर तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसायचे. कॉलेजमध्ये तिच्याएवढी हुशार व सुंदर मुलगी नव्हती. त्यामुळे बरीच मुलं तिला बोलण्यासाठी धडपड करत, पटवण्याचा प्रयत्न करत असत. सौरभ आणि सिमरनची मैत्री कॉलेजमध्ये सर्वांनाच माहीत होती. सौरभ तिची खूप काळजी घेत असे, तिला हवं ते देण्यासाठी त्याची धडपड असायची. त्याची ही धडपड पाहून सर्वांना वाटायचे की हे दोघे नक्कीच कायमचे एकत्र येतील. सौरभ तिच्या प्रेमात पडला होता. तिला कसं सांगू की मी तुझ्याशिवाय दुस-या कोणाचाही विचार करत नाही... याचाच तो विचार करायचा. पण डोळ्याचे इशारे, नजरेची भाषा, तर कधी हक्काने रागावणे तर कधी लहान मुलासारखे समजूतदारपणे बोलणे हे सिमरनचं नेहमीचं असायचं. तिलाही मी आवडत असेल का, असाही विचार तो करायचा. पण ज्या-ज्या वेळेस प्रेमाचा विषय निघत असे तेव्हा सिमरन विषय टाळत असे. त्यामुळे तिला कसं बोलणार... या आणि अनेक विचारांनी त्याच्या डोक्यात वादळ निर्माण झालं होतं. 

कॉलेजमध्ये कायमचा निरोप घेण्याची वेळ अगदी जवळ येत होती. आपण जर तिला आत्ता नाही बोललो तर पुन्हा कधीच बोलू शकणार नाही म्हणून त्याने निरोप समारंभात तिला कवितेद्वारे आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या ठरवलं. 

बघता बघता निरोप घेऊन एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ आली होती. कॉलेमधील मुली खूप रडत होत्या. सर्वजण कार्यक्रमात आपल्या आठवणी ताज्या करत होते. सौरभनेही ठरवलं होतं फक्त नजरेतून केलेलं प्रेम आज सर्वांसमोर कवितेतून तिच्यासमोर व्यक्त करणार आणि तशी कविताही त्याने रचली होती. 

कॉलेजचा निरोप समारंभ चालू होता. सौरभ आपले विचार व्यक्त करायला निघाला. जाता जाता त्याने सिमरनकडे पाहिले. ती समोरच बसली होती. सौरभ बोलत असताना त्याच्या प्रत्येक शब्दाकडे तिचे लक्ष होते. सौरभने कविता म्हणायला सुरुवात केली तशी सिमरन रडू लागली. सौरभलाही अश्रू अनावर झाले होते; परंतु सर्वजण पाहात होते म्हणून तो स्वत:ला सावरत होता. शेवटी जाता-जाता सौरभने आपल्या भावना व्यक्त केल्याने सिमरन सौरभच्या गळ्यात पडून रडू लागली. कवितेमध्ये तो म्हणाला, 
‘दुस-याशी मी बोलताना 
मनातून तू जळताना 
मी तुला पाहिलंय... 
तुझ्याजवळून लांब जाताना 
अन् नजरेतून लवकर भेट म्हणताना 
मी तुला पाहिलंय... 
आता फक्त एकदाच 
‘मी तुझीच आहे’ म्हणताना अन् 
गळ्यात पडून रडताना मला तुला पाहायचंय... 
- बालाजी सुरवसे 
==================================================================


आठवण प्रेमाची..!



आठवण म्हणजे मनातल्या भावना, दु:खाच्या वेदना, आनंदाचे शब्द आणि सतत येणारी तुझी आठवण. आपल्याला भेटून पूर्ण एक महिना झाला आहे. तू आता नाहीस; पण मला राहवत नाही. काहीतरी बोलावे... पण बोलण्याची हिंमत झाली नाही. म्हणून ‘आठवण प्रेमाची’ हा लेख तुझ्यापर्यंत पाठवतोय. माझ्या प्रेमाची, तळमळीची व्यथा तू केव्हा तरी वाचशील म्हणून लिहायला घेतलं. वाचल्यानंतर तुझं मन भरून येईल. 

तुला आठवतो तो आपला पहिला दिवस... जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो. आठवतो तुला आपल्या मैत्रीचा पहिला क्षण...? आपली मैत्री कशी झाली, केव्हा झाली. त्याग आणि पावित्र्याची जोड मिळाल्याने आपल्या मैत्रीला एक वेगळीच दिशा मिळाली. या निरागस मैत्रीची आठवण तुझ्या आणि माझ्या जन्मभर सोबत राहील. आपल्या बांधल्या गेलेल्या नात्याने आणि तुझ्या सहवासामुळे माझ्या जीवनात एक अद्भूत संगीत निर्माण झाले आहे. 

जसा भगवंत आपल्या शिष्याला मार्ग सांगतात अगदी तसाच आनंदाचा अनुभव तू मला दिलास. पण तू दिलेल्या शिकवणीमुळे समुद्रात हरवलेल्या नावेप्रमाणे कधी-कधी माझे जीवन वाटू लागले. मनातील लय खूप दूर काढून फेकली आहे. आता माझ्यात झालेला बदल... कदाचित तू हसशीलही. तुला मी वेडा वाटेल; पण हे सहनशीलतेचे धडे तूच मला शिकवलेस. तुला भेटून मनमोकळ्या गप्पा कराव्यात. खूप काही तुझ्याशी बोलावं असं वाटतंय. पाऊस कसा सारखा बरसत राहतो अगदी मनसोक्त... तसेच तुझ्या आठवणीचे नभ दाटतात. त्या पहिल्या भेटीच्या क्षणापासून ते तुला शेवटचे पाहिले तोपर्यंत अगदी रेखीव दृश्यं डोळ्यांसमोर उभी राहतात. ते तुझं हसणं-बोलणं मी कधीच विसरणार नाही. मला सगळं आठवतं... आपण फुले तोडायला गेलेलं, शाळेत मिळून गेलेलं, एकत्र बसून गप्पा मारलेलं... आणि तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यांत अश्रू येतात... अगदी पावसासारखे मनसोक्त आणि ब-याच वेळानंतर भानावर येतो. हे फक्त तुझ्या मैत्रीमुळे. खरंच आपल्या जीवनात कुणी असं स्थान मिळवतं की आपण त्याच्यासाठी आपलं सर्व विश्वच बदलून टाकतो. कुणासाठी काहीही असेल पण माझ्या जीवनात तुझं स्थान खूप महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनाच्या वाटेवर तूच फुलं टाकलीत आता तुझ्यापासून वेगळं होणं खूप कठीण आहे. एक गोष्ट लक्षात ठेव मैत्रीचे, प्रेमाचे आणि आठवणींचे धागे हे नेहमी रेशमी धाग्यासारखे असतात. जेवढे ओढून काढण्याचा प्रयत्न करावा तेवढा त्यांचा गुंता अधिक होतो. मी तुझ्यावर प्रेम करतो तसं तूही करतेस का? 

भूतकाळातल्या तुझ्या गोड आठवणी वेडं मन आठवत राहतं. मनाला फसवून सुखाबरोबर दु:खही देत असतं. कधी भरून न येणा-या जखमाही देतं. जीवन हे असं का असतं? आयुष्यात खूप काही मिळतं. त्यातलं बरंच काही नको असतं. पण जे हवे असते तेच मिळत नसते. प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत असावं वाटतं. तुझं ते हसणं, बोलणं, नाजूक फुलासारखं लाजणं हे मनसोक्त पाहावं वाटतं. तुझ्या हातात हात घेऊन दूरपर्यंत चालावंसं वाटतं. सागरात जसा नदीचा संगम होतो तसं तुझ्याशी एकरूप व्हावं वाटतं. तूच तर आहेस माझं जग. या जगात नेहमी तुझ्यासोबत जगावंसं वाटतं. 

खूप काही मागत आहे. तुझ्याकडून ब-याच अपेक्षा आहेत. यापुढे माझ्या मनात तुझे येणे-जाणे राहणार नाही. नंतर तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्या अंगणात पडणार नाही. पण यापुढे माझंही काही राहणार नाही. अखेरचे काही शब्द तुझ्यासाठी. नेहमी स्वत:ला जप. माझा जीव तुझ्यात आहे. स्वत:साठी काही मागतोय. तुझ्याकडून आशा करतोय. कारण तुझ्यापासून दूर राहण्याची ताकद आता माझ्यात नाही. तुझ्या प्रेमासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. आता तरी माझ्या प्रेमाला नकार देऊ नकोस. तुझ्याकडे दुसरं काही मागत नाही. आता तरी माझ्या मनातल्या भावना समजून घे. आजही आकाशात तुटणा-या ता-यांकडेही फक्त तुलाच मागतो. अजूनही मी तुझीच वाट पाहात आहे. फक्त तुझीच... 

-अजय गायकवाड, लातूर 
===============================================================

No comments:

Post a Comment